 |
| डॉ.बाबा आढाव |
 |
| डॉ.अशोक बेलखोडे |
किनवट : परिवर्तनाच्या लढ्यात आयुष्य पेरणारे, समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर झटणारे, ग्रामीण–शहरी श्रमिकांचा आवाज बनलेले ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय बाबा आढाव यांचे काल रात्री पुण्यात निधन झाले. रात्री नऊच्या सुमारास ही दु:खद बातमी समोर आली आणि परिवर्तनवादी चळवळ, श्रमिक कामगार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.
देशातील दलित–सवर्णातील दरी कमी करण्यासाठी, कष्टकरी, रिक्षाचालक, काच-कागद उचलणारे श्रमिक यांना जीवनमान देण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पानवठा’ ते ‘कामगार संघटना’ अशा अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. लोकशाही जिवंत ठेवण्याच्या लढ्यात बाबा आढाव हे जवळपास पाच दशकांपेक्षा जास्त काळ अग्रस्थानी राहिले.
अलीकडेच त्यांच्या सहकाऱ्यांपैकी समाजवादी विचारांचे अग्रदूत, राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले. सलग दोन्ही क्रांतिकारकांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीसमोर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
किनवटचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केलेल्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. ’’माझा बाबा आढाव यांच्याशी परिचय तब्बल चाळीस वर्षांपूर्वी झाला. बाबा आमटे आणि बाबा आढाव – या दोन्ही बाबांनी मला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवले. आता दोन्ही बाबा, आणि नुकतेच पन्नालाल भाऊही नसताना आम्ही खरंच पोरके झालो आहोत,’’ असे त्यांनी सांगितले.
कष्टकरी, शोषित, मागासलेल्या समाजघटकांचा बाप म्हणून ओळख मिळवणाऱ्या बाबांच्या जाण्याने परिवर्तनाच्या वाटेवरील प्रत्येक ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
‘‘या दुःखद प्रसंगी मी स्वतः, भारत जोडो युवा अकादमी परिवार, राष्ट्रसेवा दल किनवट परिवार व साने गुरुजी रुग्णालय परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत,’’ अशा शब्दांत डॉ. बेलखोडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.