किनवट, दि. १८ : धामनदरी(ता .किनवट) या गावातील सार्वजनिक वापरातील रस्त्याची जाणीवपूर्वक मोडतोड केल्याचा गंभीर प्रकार नुकताच समोर आला आहे .रस्त्यावर बसवलेले पेव्हर ब्लॉक काढून टाकल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.
धामनदरी येथील रहिवासी सुदर्शन बाबू भालेराव यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विष्णू भोजू राठोड यांच्या घरापासून ते मदन राठोड यांच्या घरापर्यंत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर शासनाच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले होते. मात्र, अज्ञात व्यक्तींनी हे ब्लॉक उपटून रस्त्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे.
या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांची दररोज ये-जा होत असते. रस्ता खराब झाल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा करावा, नुकसान झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सुदर्शन भालेराव व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
