![]() |
| काॅ.गंगाधर गायकवाड |
नांदेड : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीतून बोगस कामगारांच्या नावावर ७९ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरचे कामगार उपायुक्त श्री. नि. पा. पाटणकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, नांदेड यांना दिले आहेत.
हा घोटाळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव मंडळ सदस्य तथा सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उघड झाला आहे. बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
तपासात नांदेड येथील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने ८९४ मूळ बांधकाम कामगारांचा डेटा बदलून आर्थिक हितसंबंधातून बोगस नावे नोंदवली. या माध्यमातून ९२६ अर्ज सादर करण्यात आले, त्यापैकी ५८९ अर्ज मंजूर करून संबंधित लाभ वितरित करण्यात आले.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अहवाल मंडळास सादर करण्याचे, तसेच बेकायदेशीररीत्या वितरित करण्यात आलेली रक्कम त्वरित वसूल करून मंडळाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी सांगितले.
