दसरा-दिवाळीपूर्वी रास्तभाव धान्य दुकानदारांना थकबाकी मार्जिनची रक्कम द्या: रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाची मागणी
September 17, 2025
0
किनवट ,दि.१८ : महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांना दैनंदिन वितरण व परवान्यांशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत असलेली नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळ, नाशिक ने  शासनाकडे महत्वाची मागणी केली आहे.
महामंडळाचे म्हणणे आहे की, जून, जुलै व ऑगस्ट २०२५ या कालावधीत ई-पॉस मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना वितरण केलेल्या धान्याबाबत मिळणारी संपूर्ण मार्जिनची रक्कम परवानाधारकांच्या बँक खात्यावर सप्टेंबर अखेरपर्यंत जमा व्हावी. कारण ऑक्टोबर महिन्यात दसरा व दिवाळी हे प्रमुख सण येत असल्याने परवानाधारकांना आर्थिक दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे महासंघाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, अनेक परवानाधारकांचे मे २०२५ अखेरपर्यंतचे थकीत मार्जिनचे देयक अद्याप प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित मंजूर करून परवानाधारकांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
 महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळ,नाशिक  जिल्हा शाखा नांदेडचे अध्यक्ष  देवानंद सरोदे , कार्याध्यक्ष अशोक कापसीकर व महासचिव  मिलिंद सर्पे  यांनी या संदर्भातील निवेदन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना  नुकतेच सादर करून राज्यातील सर्व परवानाधारकांना न्याय देण्याचे आवाहन केले आहे.
------------------------------------------------------•
Post a Comment
0 Comments