नांदेड : नांदेडकरांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. नांदेड - मुंबई आणि नांदेड - गोवा या बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. या सेवेसाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून, प्रवाशांना आता थेट मुंबई आणि गोवा येथे प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, नांदेड - मुंबई विमानसेवेकरिता नवी मुंबई विमानतळाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणीही मंजूर झाली आहे.
या दोन्ही विमानसेवांचे संचालन स्टार एअर कंपनीकडून केले जाणार असून, आठवड्याचे सातही दिवस उड्डाणे होणार आहेत.
मुंबई - नांदेड सेवा: दररोज दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५.५५ वाजता नांदेडला पोहोचेल. परतीचे विमान सायंकाळी ६.२५ वाजता नांदेडहून उड्डाण करून रात्री ७.३५ वाजता मुंबईत उतरेल.गोवा - नांदेड सेवा: गोव्याच्या मोपा विमानतळावरून दुपारी १२ वाजता उड्डाण होऊन दुपारी १ वाजता नांदेडला उतरेल. परतीचे उड्डाण दुपारी १.३० वाजता होऊन २.४० वाजता गोव्याला पोहोचेल.
या दोन्ही सेवांमुळे नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीस्कर हवाई सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः मुंबईसाठी थेट उड्डाणामुळे व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी व रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर गोव्यासाठीची सेवा पर्यटनप्रेमींसाठी नवी संधी निर्माण करणार आहे.
सध्या नांदेडहून दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळूरू व हैद्राबाद या शहरांसाठी उड्डाणे सुरू आहेत. मुंबई व गोवा या नव्या सेवांमुळे नांदेडहून थेट उड्डाणांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.
नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले. “या विमानसेवा सुरू होणे हा त्या प्रयत्नांचा मोठा टप्पा आहे,” असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानले.