किनवट : तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची लगबग सुरू झाली असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांनी उमेदवार निवड प्रक्रियेपासून प्रचार आराखड्यापर्यंतची तयारी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत महाविकास आघाडीतील युवकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी वाढत आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरदचंद्र पवार यांनी आघाडीत ८० टक्के जागांवर पात्र व नव्या युवकांना संधी दिली जाईल, असे स्पष्ट संकेत दिल्यानंतर युवक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडेच झालेल्या एका बैठकीत शेकडो युवकांनी युवा नेते करण एन्डरलवार यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी ठेवावे, अशी ठाम मागणी केली. या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
करण एन्डरलवार यांचे नाव सध्या स्थानिक पातळीवर विशेष चर्चेत आहे. त्यांच्या मातोश्री यापूर्वी जिल्हा परिषद, गोकुंदा येथून निवडून आल्या होत्या, त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा ठसा आजही जाणवतो. त्यामुळे यावेळी ग्रामीण भागातून करण एन्डरलवार यांनी गोकुंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी युवक वर्गातून होत आहे.
बैठकीत उपस्थित अनेक युवकांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा झेंडा तालुक्यात अधिक बुलंद करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
एकूणच, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात युवक नेतृत्व केंद्रस्थानी येत असून, करण एन्डरलवार हे नव्या पिढीचे समर्थ, ऊर्जावान आणि विश्वसनीय चेहरा म्हणून उदयास येत आहेत.

Post a Comment
0 Comments