किनवट :पाटोदा खुर्द(ता.किनवट)येथील एका अविवाहित महिलेचा तिच्या प्रियकरानेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ता.२५ रोजी उघडकीस आली. आरोपी युवक फरार असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मंगल धुमाळे (वय ४५) या आई आणि भावाच्या शेजारी स्वतंत्रपणे राहत होत्या. त्यांचे लग्न झाले नव्हते; मात्र गावातीलच कृष्णा जाधव (वय३०) याच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते.
शनिवारी सकाळी मंगलची आई घरात गेली असता, ती निपचित अवस्थेत आढळली. तिच्या तोंडावर उशी होती व जीभ बाहेर पडलेली होती. त्यामुळे गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, मृतकाच्या बहिणीने रात्री कृष्णा जाधवला घरातून बाहेर जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अवघ्या बारा दिवसांत किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेली ही दुसरी खुनाची घटना असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Post a Comment
0 Comments