किनवट : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दारात आल्या असून, तालुक्यातील गोकुंदा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने प्रमुख पक्षांतील इच्छुकांनी हालचालींना वेग दिला आहे.
गोकुंदा गण हा पारंपरिकरीत्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यंदा महायुतीकडून माजी खासदार हेमंत पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि आमदार भीमराव केराम यांचे निकटवर्तीय मारोती सुंकलवाड हे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत. शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सन २०२७ मध्ये हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यावेळी शिवसेनेकडून प्रमिला सुंकलवाड (मारोती सुंकलवाड यांच्या सौभाग्यवती) यांनी ऐतिहासिक विजय मिळवून २००९ ते २०१२ या काळात पंचायत समिती सभापतीपद भूषविले होते. त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीच्या कामकाजात सकारात्मक बदल झाल्याची नोंद आहे.
तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मारोती सुंकलवाड यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे “२००७ ची राजकीय पुनरावृत्ती होणार का?” असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
अनुभव, लोकसंग्रह आणि केराम यांचे आशीर्वाद
मारोती सुंकलवाड हे अभ्यासू, अनुभवी आणि लोकसंग्रहशील नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी दिशा समितीवर सदस्य म्हणून काम करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच माजी आमदार पाचपुते यांच्या कार्यकाळात त्यांनी जवळून काम करून अनुभवाचा ठेवा मिळविला आहे.
आमदार भीमराव केराम यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्याकडून मिळणारा राजकीय पाठिंबा यामुळे सुंकलवाड यांची दावेदारी अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभारणी, तसेच मातंग समाजाच्या सामूहिक लग्नमेळाव्याचे आयोजन या उपक्रमांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. प्रशासनाशी असलेला अनुभव आणि सर्व समाजघटकांशी जपलेले स्नेहबंध ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, आ. भीमराव केराम यांची कृपादृष्टी सुंकलवाड यांच्यावर राहणार. त्यामुळे महायुतीकडून गोकुंदा गणातील प्रबळ दावेदार म्हणून सुंकलवाड यांचे नाव आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
मारोती सुंकलवाड यांची प्रतिक्रिया
“गोकुंदा पंचायत समिती गण हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. त्यामुळे यावेळी महायुतीत ही जागा शिवसेनेलाच मिळेल, अशी मला खात्री आहे.
माझे गुरु आमदार भीमराव केराम हे युतीधर्माचे पालन करून मला संधी देतील, असा माझा दृढ विश्वास आहे.
पंचायत समितीचे सभापतीपद हे राबविण्याचे, ग्रामीण विकास साधण्याचे आहे. पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास ग्रामीण भागाचा कायापालट करून दाखवेन,”
असे मारोती सुंकलवाड यांनी 'लोकावाज', शी बोलताना सांगितले.


Post a Comment
0 Comments