नांदेड : नागपूर येथे महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे भूमीपूजन ब्राह्मणी कर्मकांड पद्धतीने करण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध नोंदवत ही कृती "महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान" असल्याचे म्हटले आहे.
डॉ. भिंगे म्हणाले, "महात्मा फुले यांनी आयुष्यभर ज्या ब्राह्मणी कर्मकांडांना विरोध केला, त्या कर्मकांडांची पुनरावृत्ती त्यांच्या नावाने होणाऱ्या संस्थेच्या भूमीपूजनात करणे ही फडणवीस यांची जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. संस्था स्थापन करण्यास कुणालाही विरोध नाही, परंतु ज्या महापुरुषांच्या नावाने ती उभी केली जाते, त्यांचे विचार आणि आचार लक्षात घेणे आवश्यक आहे."
"फडणवीस यांना हे सर्व ठाऊक असूनही ते बहुजन महापुरुषांचा अवमान करण्याची संधी म्हणून असे करीत असतात. ‘तुमचे महापुरुष आम्ही आमच्या पद्धतीने स्वीकारू, कारण सत्ता आमची आहे’ — अशा भूमिकेतूनच या कर्मकांडे केली जात आहेत," असा आरोप डॉ. भिंगे यांनी केला.
भिंगे यांनी सत्ताधारी पक्षातील काही बहुजन नेत्यांवरही टीका करताना म्हटले की, "सत्तेचे भाट बनलेले हे नेते देवाभाऊ म्हणून आरत्या ओवाळीत आहेत. अशांकडून विरोधाची अपेक्षा नाही; अपेक्षा आहे ती महात्मा फुले यांचे विचार समजून घेतलेल्या सत्यशोधक जनतेकडून."


Post a Comment
0 Comments